यंदा कृषी प्रदर्शनात 500 प्रकारच्या गुलाब पुष्पांचे प्रदर्शन 25 डिसेंबरपासून श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन
सोलापूर : श्री
सिध्देश्वर गड्डया यात्रेचे औचित्य साधून येत्या 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत होम
मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी व
औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात येणार
असून, या कृषी प्रदर्शनात 500 प्रकारच्या गुलाब पुष्पांचे प्रदर्शन भरविण्यात
येणार आहे, तसेच शेतीत एआय तंत्रज्ञानाचा डेमोही
शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळणार आहे, अशी माहिती सिध्देश्वर
देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री
सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रदर्शन भरविले जात
असून, यंदा प्रदर्शनाचे 55 वे वर्ष आहे. कृषी प्रदर्शनात 300
स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग
यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्यो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत
भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा.महापालिका आयुक्त
डॉ.सचिन ओम्बासे यांच्याहस्ते उदघाटन होणार आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी
स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार
आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत. दि. 26 डिसेंबर रोजी
सकाळी 10 ते सायं.6 पर्यंत गाय, बैल, वासरू,
म्हैस अशा विविध पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजाती चे
भव्य प्रदर्शन व स्पर्धा होणार आहे.
27 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत 35 हून
अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व स्पर्धा
होणार असून, त्याचदिवशी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत
पुष्प रचना स्पर्धा होणार आहे. दि.28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 3 पर्यंत
विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा होणार आहे. तसेच रोटरी क्लब
सोलापूर यांच्या सहकार्यातून राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन 500 हुन अधिक विविध
प्रकारचे गुलाब एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहे. या पत्रकार परिषदेस कृषी प्रदर्शन
समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, आत्माचे निवृत्त उपसंचालक
विजयकुमार बरबडे, विश्वनाथ लब्बा, निलकंठप्पा
कोनापुरे, तम्मा मसरे, विलास कारभारी,
सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.
* जगातील सर्वात लांब 1 हजार केळी लागलेला घड
* तांदूळ महोत्सव विविध प्रजातींच्या तांदूळ
* जगातील सर्वात लांब 15 inch लांब गव्हाची लोम्बी आणि कुदरत 17 ही देशी बियाणे
* दुर्मिळ देशी 500 हून बियाण्यांचे प्रदर्शन
* होम गार्डन किटचे लाईव्ह प्रात्यक्षिक
* 26 डिसेंबर रोजी पशुधन प्रदर्शन, स्पर्धा
* 27 डिसेंबर रोजी श्वानांचे प्रदर्शन (dog
show)
* 28 डिसेंबर रोजी पाळीव मांजरांचे प्रदर्शन(cat
show)