महापालिका निवडणुकीत भाजपची विजयी सलामी; राज्यभरात ८ उमेदवार बिनविरोध विजयी

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने विजयी सलामी देत दमदार सुरुवात केली आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये भाजपचे आतापर्यंत ८ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, यामध्ये कल्याण–डोंबिवली, धुळे, पनवेल आणि भिवंडी महापालिकांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. विशेष बाब म्हणजे येथे भाजपच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून, भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी उघडले आहे. कल्याण–डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक १८ मधून रेखाताई चौधरी, प्रभाग क्रमांक २६-क मधून आसावरीताई केदार नवरे, तर प्रभाग क्रमांक २६-ब मधून रंजना मीतेश पेणकर यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

यानंतर धुळे महापालिकेत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. पनवेल महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून भाजपचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरल्यामुळे नितीन पाटील यांचा मार्ग सुकर झाला. दरम्यान, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीतही भाजपला पहिला विजय मिळाला आहे. वार्ड क्रमांक १७ (ब) मधून भाजपचे उमेदवार सुमित पाटील यांच्याविरोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. सुमित पाटील हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे आहेत. या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतली असून, आगामी निकालांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.