अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन; नवीन वर्षाची सुरुवात ठरली दुःखद
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही
अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्याची पत्नी नेहा स्वामी यांच्यासाठी २०२६ या नवीन
वर्षाची सुरुवात अत्यंत दुःखद ठरली आहे. नेहाचे वडील राकेश चंद्रा स्वामी (वय ७३)
यांचे गुरुवारी निधन झाले. अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या
माहितीनुसार, राकेश चंद्रा स्वामी यांची प्रकृती यापूर्वी
उत्तम होती. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवणासाठी बसले असताना त्यांना अचानक
हृदयविकाराचा झटका (स्ट्रोक) आला. त्यानंतर त्यांना तातडीने बेलेव्यू रुग्णालयात
दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले
होते, मात्र अखेर गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दरम्यान,
अर्जुन बिजलानी आपल्या कुटुंबासह नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला
गेला होता. दुबईला रवाना होण्यापूर्वीच त्याने नेहाच्या वडिलांची भेट घेतली होती.
मात्र मंगळवारी त्यांच्या आजारपणाची माहिती मिळताच अर्जुन आणि नेहाने दुबईचा दौरा
अर्धवट सोडून तातडीने मुंबई गाठली. अर्जुन बिजलानीचे आपल्या सासऱ्यांशी अतिशय
जिव्हाळ्याचे नाते होते. अर्जुनने लहान वयातच आपल्या वडिलांना गमावले असल्याने तो
सासऱ्यांना वडिलांच्या स्थानी मानत असे. त्यांच्या निधनामुळे अर्जुन आणि नेहावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अर्जुन आणि नेहाच्या लग्नाला १३ वर्षांहून अधिक काळ
झाला असून ते मनोरंजन विश्वातील एक लाडकं जोडपं मानलं जातं. या कठीण काळात
अर्जुनचे चाहते तसेच टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक सहकाऱ्यांनी सोशल
मीडियाच्या माध्यमातून राकेश चंद्रा स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.