सोलापूर महापालिका निवडणूक: भाजपाच्या एबी फॉर्मवरून उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी गोंधळ
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज
दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. भाजपाकडून वेळेत एबी फॉर्म न
दिल्याचा आरोप करत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ
तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या उमेदवारी
अर्जांपैकी भाजपाच्या काही उमेदवारांचे बी फॉर्म पोहोचलेच नाहीत, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. भाजपाने ठरलेल्या वेळेत बी
फॉर्म दिले नाहीत, त्यामुळे उमेदवारांचे अर्ज अडचणीत आल्याचे
सांगण्यात आले. या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षातील काही
उमेदवारांनी, सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांच्या आडून मनमानी
कारभार करत असून जुलूमशाही सुरू आहे, असा आरोप केला. काही
उमेदवारांचे एबी फॉर्म ठरलेल्या वेळेत न आल्याने वातावरण अधिकच तापले. विरोधी
पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला की, वेळ संपल्यानंतर भाजपाचे
काही एबी फॉर्म आणले गेले. त्यामुळे ठरलेल्या वेळेनंतर
कोणतेही एबी फॉर्म स्वीकारू नयेत, या मागणीसाठी विरोधी
नेत्यांनी निवडणूक कार्यालयाच्या बंद दरवाजाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महत्त्वाचे
म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ ३० डिसेंबर
रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र, तीन वाजल्यानंतरही भाजपाच्या काही उमेदवारांचे एबी फॉर्म स्वीकारले जात
असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सोलापूर महापालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.