अनगर नगरपंचायत वाद पेटला; नवनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांच्या उमेदवारीविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांच्या उमेदवारी अर्जात गंभीर स्वरूपाच्या चुका असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वकिलांमार्फत सोलापूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेश पाटील आणि त्यांचे विधिज्ञ अ‍ॅड. दत्तात्रय घोडके यांनी माहिती देताना सांगितले की, माहिती अधिकार कायद्यान्वये प्राजक्ता पाटील यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत प्राप्त झाली असून, त्यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणात माजी उमेदवार उज्वला थिटे यांनीही आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, निवडणूक अधिकाऱ्यांनी प्राजक्ता पाटील यांचा उमेदवारी अर्ज तपासलाच नव्हता का? उमेदवारी अर्जात पतीचे नाव लिहिण्याच्या रकान्यात ‘निल’ असे नमूद करण्यात आले असून प्रत्यक्षात पती अजिंक्यराणा पाटील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, प्राजक्ता पाटील आणि त्यांचे पती अजिंक्यराणा पाटील यांच्या संपत्ती व उत्पन्नाबाबतही चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अजिंक्यराणा पाटील यांना साखर कारखान्यातून लाखो रुपयांचे वेतन मिळत असतानाही प्रतिज्ञापत्रात उत्पन्न शून्य दाखवण्यात आल्याचे उज्वला थिटे यांनी नमूद केले. माझा उमेदवारी अर्ज फक्त सूचकाची सही नसल्यामुळे बाद करण्यात आला, मात्र प्राजक्ता पाटील यांच्या अर्जात गंभीर चुका असूनही तो वैध ठरवण्यात आला. आम्हाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय का?” असा सवाल उज्वला थिटे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत उज्वला थिटे यांनी देखील न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने अ‍ॅड. दत्तात्रय घोडके यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात याचिका सादर करण्यात आली असून, लवकरच या प्रकरणावर सुनावणी होऊन न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे अनगर नगरपंचायत निवडणूक वाद पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे.