नांदेडमध्ये कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; आई-वडील आणि दोन तरुण मुलांचा दुर्दैवी अंत
मुदखेड (नांदेड) : मुदखेड
तालुक्यातील जवळा मुरार (बारड सर्कल) येथे माणुसकीला हादरवणारी एक अत्यंत दुर्दैवी
घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आई-वडील आणि त्यांच्या दोन
तरुण मुलांनी सामूहिक आत्महत्या करून जीवन संपवल्याने संपूर्ण नांदेड जिल्हा
हादरून गेला आहे. बुधवारी (दि. २४) रात्री ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या
माहितीनुसार, रमेश लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई लखे
हे दोघे आपल्या राहत्या घरात बाजेवर मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे
नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, त्यांचे
दोन तरुण मुलगे उमेश आणि गोविंद यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन
आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच वेळी कुटुंबातील चारही सदस्यांचा
मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या सामूहिक आत्महत्येमागील
नेमके कारण काय, आर्थिक अडचणी होत्या की कौटुंबिक तणाव,
याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस
निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. “आई-वडील घरात
मृतावस्थेत आढळले असून दोन मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. मृत्यूचे नेमके
कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून तपासानंतरच सत्य समोर
येईल,” अशी माहिती त्यांनी दिली. अल्पभूधारक असूनही कष्टाने
संसार चालवणाऱ्या लखे कुटुंबाचा असा अंत होईल, यावर
गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. तरुण मुलांच्या अकाली जाण्याने आणि आई-वडिलांच्या
संशयास्पद मृत्यूने जवळा मुरार परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त
केली जात आहे.