अमेरिका–इराण युद्धाचा तेल बाजारावर मोठा परिणाम; होर्मुझमधून पुरवठा ठप्प होण्याचा इशारा
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक
ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. S&P Global च्या अहवालानुसार, संघर्ष तीव्र झाल्यास इतिहासातील सर्वात मोठी तेल पुरवठा बाधा निर्माण होऊ
शकते. विशेषतः Strait of Hormuz येथील वाहतूक ठप्प झाल्यास
परिस्थिती गंभीर बनेल.
होर्मुझमधून किती तेल जाते?
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल
वाहतुकीचा मार्ग मानला जातो. चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत दररोज सुमारे
२.०८ कोटी बॅरल कच्चे तेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने याच मार्गाने पाठवली गेली.
यापैकी तब्बल ८२ टक्के पुरवठा आशियाई बाजारात पोहोचला. जगातील सुमारे १८ टक्के
द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) पुरवठाही या मार्गावर अवलंबून आहे.
टँकरची संख्या ६० वरून ५ वर
‘कमोडिटीज अॅट सी’च्या आकडेवारीनुसार,
१ मार्च रोजी होर्मुझमधून केवळ ५ तेलटँकर गेले, जेथे सामान्यतः दररोज सुमारे ६० टँकरची वर्दळ असते. ही घट एक आठवडा टिकली
तरी ती ऐतिहासिक मानली जाईल. अधिक काळ अशी स्थिती राहिल्यास जागतिक बाजारात मोठी
उलथापालथ होऊ शकते.
दररोज १.५ कोटी बॅरल धोक्यात
वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यास दररोज सुमारे १.५ कोटी बॅरल
कच्चे तेल आणि इतर उत्पादने अडकू शकतात. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब
अमिरातींच्या पाइपलाइनद्वारे काही प्रमाणात तेल वळवणे शक्य असले तरी त्यांची
क्षमता मर्यादित आहे. जर अनेक महिने दररोज ७० ते ८० लाख बॅरलची कमतरता राहिली, तर ते रशिया–युक्रेन युद्ध किंवा १९९० च्या आखाती युद्धापेक्षाही मोठे
संकट ठरू शकते.
तेलाचा भाव १०० डॉलरपार?
S&P ग्लोबलच्या मते, अल्पकालात तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार संभवतात. अफवा, भीती आणि साठेबाजीमुळे दर वाढू शकतात. जर होर्मुझमधील पुरवठा सुरळीत झाला
आणि इराणची निर्यात वगळली गेली, तर कच्च्या तेलाचा भाव ८०
डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहू शकतो. मात्र दीर्घकाळ पुरवठा कमी राहिल्यास दर १००
डॉलर प्रति बॅरल किंवा त्यापुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केल्याने जागतिक बाजाराचे
लक्ष मध्यपूर्वेकडे लागले आहे.