सोलापुरात पाण्यासाठी नागरिकांचे मृत्यू लाजिरवाणे : असदुद्दीन ओवेसी यांचा महापालिका कारभारावर जोरदार हल्ला

सोलापूर शहरात आजही पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांचे हाल होत असून त्यातून थेट जीव जात आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची तीव्र टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. पाणी कमी वेळ आणि कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना मोटार लावून पाणी उचलावे लागते आणि त्यात विजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले,
गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात १०४ रुपयांना का? अवघ्या २५० किमी अंतरावर असलेले पुणे इतके पुढे गेले, मग सोलापूर मागेच का राहिले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या निधीवर सवाल महानगरपालिकेकडे आलेल्या सुवर्णजयंती योजनेतील ४०० कोटी रुपये आणि अमृत योजनेतील १५० कोटी रुपये नेमके कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले? असा गंभीर प्रश्न विचारत त्यांनी महापालिका कारभारावर जोरदार हल्ला चढवला.
तसेच, महानगरपालिकेचा तब्बल १३०० कोटींचा अर्थसंकल्प कुठे खर्च होतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खून व अपघातांवर संताप निवडणूक तिकिटाच्या वादातून रविवार पेठेतील तरुणाचा खून होणे सोलापुरासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे ओवेसी म्हणाले.
तसेच एमआयडीसीतील आगीत कामगारांचा जनावरांप्रमाणे मृत्यू झाला आणि एकही जीव अग्निशामक दल वाचवू शकले नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली. 
फारूक शाब्दी प्रकरणावर हस्तक्षेप सभेदरम्यान फारूक शाब्दी यांचे नाव घेताच उपस्थितांमधून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. एका इच्छुक उमेदवाराने भाषण करताना भावुक होऊन अश्रू ढाळले. त्या वेळी ओवेसी यांनी स्वतः माईकचा ताबा घेत हस्तक्षेप केला. ते म्हणाले, “फारूक शाब्दी यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी एकदाही चर्चा केली नाही. निवडणुकीनंतर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न करीन. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही,” असे आश्वासन देत त्यांनी जमावाला शांत केले. दरम्यान, सायंकाळी सोलापुरात ओवेसी यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले, त्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापले आहे.