छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीवर हल्ल्याचा प्रयत्न; तणावानंतर पोलिसांचा लाठीमार
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती
संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या
प्रचार रॅलीवर बायजीपूरा परिसरात एका गटाने चाल करून जाण्याचा प्रयत्न केल्याची
घटना घडली. या घटनेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत एक कार्यकर्ता जखमी झाला.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगवले.
नेमकी घटना काय?
इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपूरा भागातून जात असताना सुरुवातीला काही तरुणांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी जलील यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे रॅली पुढे गेली. रॅली संपल्यानंतर अचानक काही तरुण जलील यांच्या वाहनाच्या दिशेने धावून आल्याने दोन गट समोरासमोर आले. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीमार केला. शिरसाट, सावे यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप या घटनेनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट आणि सावे यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “आमच्यावर एका घोळक्याने हल्ला
केला. त्यांना वाटले रॅली रद्द होईल, पण आम्ही घाबरणारे
नाही. पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेज दिले आहे.”
कलीम कुरेशी यांचा पलटवार या प्रकरणावर काँग्रेसचे
उमेदवार कलीम कुरेशी यांनी खळबळजनक दावा केला आहे. “जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामुळे
त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हा हल्ला त्यांच्याच माणसांनी केला असून
सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणला,” असा
आरोप कुरेशी यांनी केला. या घटनेशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले.
एमआयएम कार्यकर्त्यांचे आरोप
दरम्यान, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण
घटनेस काँग्रेस उमेदवार कुरेशी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना पूर्वसूचना देऊनही योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला नाही,
असा दावा करत रॅली अडविण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरात
कडक बंदोबस्त या घटनेनंतर काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या बायजीपूरा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दोन्ही
बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.