शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली १.१० कोटींची फसवणूक; कोल्हापूर-पन्हाळ्यात सायबर पोलिसांची मध्यरात्री धडक

मुंबईतील पवई परिसरात राहणारे व्यावसायिक विमलकुमार गोयंका यांची शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई क्राईम ब्रँचच्या पश्चिम विभाग सायबर पोलिस पथकाने कोल्हापूर आणि पन्हाळ्यात मध्यरात्री छापेमारी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चेतन मुकुंद पाडळकर (वय २९, रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) आणि दस्तगीर शमशुद्दीन काझी (वय ५२, रा. पन्हाळा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईमुळे कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

फसवणुकीचं जाळं कसं विणलं?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सायबर टोळीने व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विमलकुमार गोयंका यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवत त्यांना एका बनावट ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला ॲपवर मोठ्या रकमेचे नफे दाखवून गोयंका यांचा विश्वास संपादन करण्यात आला. विश्वास बसावा म्हणून त्यांनी गुंतवलेले ३ लाख रुपये परत काढून देण्यात आले. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले.

कराच्या नावाखाली आणखी पैसे उकळले

खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आणि कथित कर भरण्याच्या कारणाखाली भामट्यांनी गोयंका यांच्याकडून वारंवार पैसे मागितले. अशा प्रकारे विविध कारणे सांगत एकूण १ कोटी १० लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर आरोपींनी अचानक संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोयंका यांनी मुंबई वेस्ट सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदोरे कंबोडिया आणि म्यानमारशी संबंधित आंतरराष्ट्रीय सायबर टोळीपर्यंत जात असल्याचे उघड झाले आहे.

आंतरराष्ट्रीय टोळीचा कोल्हापूरपर्यंत माग

सायबर पोलिसांच्या तपासात कोल्हापूर आणि पन्हाळा परिसरात आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार छापेमारी करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.