बार्शी तालुक्यात फिरते गर्भलिंग निदान व बेकायदा गर्भपात केंद्र उघड; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
बार्शी तालुक्यातील जामगाव (आ.) शिवारात एका आलिशान कारमधून चालवण्यात
येणारे फिरते गर्भलिंग निदान व बेकायदा
गर्भपात केंद्र पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या
कारवाईत माढा तालुक्यातील एका बोगस
डॉक्टराला रंगेहाथ पकडण्यात आले असून १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे ४:४० वाजण्याच्या सुमारास जामगाव शिवारातील वाणेवाडीकडे जाणाऱ्या
रस्त्यालगतच्या पडीक शेतात एक आलिशान कार संशयास्पदरीत्या उभी
असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता हा
धक्कादायक प्रकार उघड झाला.
छाप्यात काय सापडले?
कारमधील दोन काळ्या सॅकमध्ये पुढील
साहित्य आढळून आले—
- सुमारे ३ लाख रुपये किमतीची
‘झोन केअर’ कंपनीची चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व प्रोब
- गर्भपातासाठी
वापरल्या जाणाऱ्या मिफेप्रिस्टोन व
मिसोप्रोस्टोल या प्रतिबंधित
गोळ्यांचा मोठा साठा (१४४ सीलबंद
गोळ्या)
- गर्भपातासाठी
वापरलेल्या गोळ्यांची ५१ रिकामी पाकिटे
- रक्त
लागलेले क्युरेटेज साहित्य
- रक्तस्त्राव
थांबवण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स, सलाईन बाटल्या, ग्लोव्हज तसेच इतर वैद्यकीय
साहित्य
ही सर्व सामग्री गर्भलिंग निदान व बेकायदा गर्भपातासाठी वापरली जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध PCPNDT कायदा व गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास
पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.