अक्कलकोटमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्या : प्रियकराने धारदार शस्त्राने प्रेयसीचा खून, आत्महत्येचा प्रयत्न
अक्कलकोट शहरातील हद्दवाढ भागात प्रेमसंबंधातून
घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बासलेगाव रोडवरील एका खासगी घरात स्वामीभक्त असल्याचे सांगून एका
दिवसासाठी भाड्याने रूम घेऊन राहिलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा धारदार
शस्त्राने निघृण खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर वार करून
आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना ४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० ते
१०:४५ च्या सुमारास घडली. या प्रकरणात स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २०,
रा. पोगुलमाळा, रामवाडी, सोलापूर) हिचा मृत्यू झाला असून आदित्य रमेश
चव्हाण (वय २२, रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) हा आरोपी आहे. त्याच्यावर
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य चव्हाण याने तीक्ष्ण हत्याराने स्नेहा हिच्या गळ्यावर वार
करून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावरही वार करून तो गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
भाड्याच्या घरात घडली घटना
स्नेहा बनसोडे आणि आदित्य चव्हाण यांच्यात मागील काही
काळापासून प्रेमसंबंध होते. ४ जानेवारी रोजी सकाळी ते दोघे बासलेगाव रोडवरील
लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पिरजादे प्लॉटमधील कोळी यांच्या घरात
थांबले होते. याच ठिकाणी हा भीषण प्रकार घडला.
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणी स्नेहाच्या आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे (वय
४०, रा. सोलापूर) यांनी
फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम १०३ (१) तसेच अनुसूचित जाती
व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३ (२) (व्ही) अंतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार
यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक भिताडे (प्रभारी अधिकारी, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे) करत
आहेत.
या घटनेमुळे अक्कलकोट परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रेमसंबंधातून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात
आहे.