सोलापुरात राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून; परिसरात तणाव

सोलापूर : सोलापुरातील रविवार पेठेतील जोशी गल्ली परिसरात राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सोलापुरात मोठा गोंधळ उडाला असून, रविवार पेठेतील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खून झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव बाळासाहेब पांडूरंग सरवदे असे आहे. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांना दिली. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत बाळासाहेब सरवदे यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी प्राण सोडले. दरम्यान, रुग्णालय परिसरात जमावाने मोठा गोंधळ घालत हॉस्पिटलमधील साहित्याची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि परिसरात परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या बाळासाहेब सरवदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी शासकीय रुग्णालय परिसरात तसेच रविवार पेठ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापुरात तणावपूर्ण वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.