राजकीय संन्यासाचे संकेत दिल्यानंतर चिपळूणमध्ये नारायण राणेंची प्रकृती खालावली, भाषणादरम्यान चक्कर
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे
यांनी कालच राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमध्ये त्यांच्या
प्रकृतीबाबत चिंताजनक घटना घडली. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण सुरू असताना
त्यांना अचानक चक्कर आली, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच धावपळ
उडाली. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात राणेंचा आवाज बसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
चक्कर येत असल्याची जाणीव होताच त्यांनी भाषण तात्काळ आटोपते घेतले. प्रकृती
अस्वस्थ असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला.
कार्यक्रमानंतर नारायण राणे थेट विश्रामगृहाकडे रवाना
झाले. यावेळी त्यांच्या पत्नींसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अनेक
कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस करत काळजी व्यक्त केली. कालच
दिले होते राजकीय निवृत्तीचे संकेत काल सिंधुदुर्गातील सभेत बोलताना नारायण राणे
यांनी राजकीय संन्यासाचे स्पष्ट संकेत दिले होते. “वय झालं
आहे, आता थांबायला हवं. दोन्ही मुलं राजकारणात स्थिर झाली
आहेत. उद्योग सांभाळण्यासाठीही कुणीतरी पाहिजे,” असे सूचक
विधान त्यांनी केले होते. याच भाषणात त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले होते की,
“आजही नारायण राणे रस्त्यावर भाजी घेतो. माझ्या गाडीला काळ्या काचा
नाहीत. माणुसकी हा माझा धर्म आहे. राजकारणात कटकारस्थानं झाली, अडचणी आल्या. त्यामुळे आता ठरवलंय – घरी बसायचं. मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे, चांगल्याला जोपासा.” राजकारणात
चर्चेला उधाण राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर लगेचच प्रकृती खालावण्याची घटना
घडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील प्रभावी नेतृत्व मानल्या जाणाऱ्या नारायण राणेंच्या पुढील
भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.