उमेदवारी माघारीच्या वादातून मनसे कार्यकर्त्याचा खून; अमित ठाकरे यांचे भावनिक आवाहन

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज माघारीच्या कारणावरून राजकीय वातावरण चिघळले असून, या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण तापले असून, राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परवा झालेल्या या खुनी हल्ल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, रविवारी मनसे नेते अमित ठाकरे सोलापुरात दाखल झाले. त्यांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

अमित ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर आम्ही सगळे उमेदवार माघार घेतो. तुम्ही निवडणुका जिंका, पण निष्पाप लोकांचे बळी घेऊ नका.” राजकारणामुळे निर्माण झालेली ही भयावह परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोलापुरात येऊन पाहावी, अशी मागणी करत अमित ठाकरे म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे. आता मी गप्प बसणार नाही. लवकरच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.”

राजकीय वातावरण तापले

या घटनेनंतर सोलापूरमध्ये तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाढत चाललेली हिंसा आणि उमेदवारी माघारीसाठी होणारा दबाव यावरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. मनसेसह विरोधी पक्षांनी या घटनेला निवडणूक दहशतीचे उदाहरण म्हटले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.