सोलापूर महापालिका निवडणूक : युती असूनही २२ जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना आमने-सामने
सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित
पवार गट) आणि शिंदेसेना यांची अधिकृत युती जाहीर झाली असली, तरी प्रत्यक्ष मैदानात दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे चित्र दिसून येत आहे.
तब्बल २२ प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत.
शुक्रवार, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा
शेवटचा दिवस असतानाही या जागांवर उमेदवारी मागे घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे. आमने-सामने
असलेल्या जागांवर आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू, असे दोन्ही
पक्षांकडून सांगण्यात आले आहे. “जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच
आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे उमेदवार समोरासमोर असले
तरी ती मैत्रीपूर्ण लढत असेल,” असे राष्ट्रवादी (अजित पवार)
पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित
पवार) गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. पक्षाने तब्बल १०२ जागांवर
उमेदवार देण्याची तयारी केली होती. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शिंदेसेना
आणि अजित पवार गटाची अचानक युती जाहीर झाली. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला
प्रत्येकी ५१ जागा देण्याचे ठरले. असे असतानाही निश्चित जागांपेक्षा अधिक, म्हणजेच २२ जागांवर दोन्ही पक्षांनी उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने गोंधळ
निर्माण झाला आहे. या जागांवर उमेदवार अर्ज मागे घेण्यास तयार नसल्याने पक्ष
पदाधिकाऱ्यांची अडचण वाढली आहे.
आजच्या बैठकीत तोडगा निघणार?
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना
या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आमने-सामने असलेल्या
२२ जागांबाबत चर्चा होणार असून, तोडगा न निघाल्यास
मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारला जाईल, अशी माहिती
देण्यात आली आहे. शिंदेसेनेचे प्रभारी नेते श्रीनिवास संगा यांनी सांगितले
की, “पालिकेत शिंदेसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, असे प्रयत्न सुरू आहेत. युती कायम आहे. आमने-सामने असलेल्या जागांवर
सकारात्मक चर्चा होईल, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही
तयार आहोत.” या २२ प्रभागांतील लढतीमुळे सोलापूर महापालिका निवडणूक
अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे
संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.