थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उद्धवसेना आणि
मनसे यांच्या राजकीय युतीची आज अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच राजकीय युती करत
असल्याने दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. मराठी
माणूस आणि मराठी अस्मिता एकत्र येत असून महायुतीला आव्हान देण्यासाठी ठाकरे बंधू
एकवटले असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. वरळीतील ब्ल्यू सी
हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार असून
याच ठिकाणी युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर मुंबईसह विविध
महापालिकांतील शिवसैनिक आणि मनसैनिक जल्लोष साजरा करणार आहेत. अनेक वर्षांनंतर
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक एकत्र येत असल्याने ही घडी कार्यकर्त्यांसाठी भावनिक ठरणार
आहे. पत्रकार परिषदेसाठी हॉटेल ब्ल्यू सी येथे विशेष व्यासपीठ उभारण्यात आले असून
त्यावर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. व्यासपीठाच्या मागे बाळासाहेब ठाकरे
यांचा फोटो, मनसेचे रेल्वे इंजिन चिन्ह आणि
उद्धवसेनेची मशाल असलेला बॅनर लावण्यात आला आहे. यामुळे या युतीचे प्रतीकात्मक
महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज
ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी
एकत्रित अभिवादन करणार असून त्यानंतर ते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार
आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली,
नाशिक, पुणे यांसारख्या प्रमुख महापालिकांसाठी
या युतीची दिशा आज स्पष्ट होणार आहे. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू राजकारणात
एकत्र येत असल्याने ही केवळ राजकीय युती न राहता कार्यकर्त्यांसाठी भावनिक क्षण
ठरत आहे. पत्रकार परिषदस्थळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे
आणि राज ठाकरे यांचा एकत्रित बॅनर लावण्यात आला असून युतीच्या घोषणेकडे संपूर्ण
महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.