ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा; संजय राऊत यांचा ट्विटमधून संकेत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील नेते आणि प्रमुखांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, याबाबत उत्सुकता असतानाच त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (X) अकाउंटवरून युतीच्या घोषणेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला असून, त्या फोटोमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत संजय राऊत यांनी केवळ “उद्या १२ वाजता” असे लिहिले आहे. या ट्विटवरून बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः मुंबईतील राजकारणाचे लक्ष लागले आहे.

युतीसोबत जागावाटपाचीही घोषणा?
दरम्यान, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात बैठका झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या संयुक्त घोषणेत केवळ युतीच नव्हे तर मुंबई महापालिकेसाठीच्या जागावाटपाचाही खुलासा होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी युती आधीच झाल्याचे संकेत दिले होते. “जागावाटपाची औपचारिक घोषणा बाकी आहे. आमच्यात कोणताही विसंवाद नाही. वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, तेव्हाच युती झाली,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता ट्विटद्वारे युतीच्या घोषणेचा मुहूर्त जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.