राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश; पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला नवे वळण

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला तीव्र विरोध दर्शवला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप झाल्यानंतर हा विरोध शांत करण्यात आला असून, अखेर राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानुसार आज ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेशासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राहुल कलाटे हे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणातील परिचित नाव आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, याआधी शिवसेनेचे गटनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला होता, तर भाजपचे शंकर जगताप यांचा विजय सुकर झाला होता. वाकड परिसरात राहुल कलाटे यांची मजबूत पकड असल्याने भाजपने त्यांना पक्षात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. त्यांच्या प्रवेशाला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राम वाकडकर यांनी विरोध केला होता. मात्र, हा विरोध मागे पडल्याचे चित्र आहे. राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.