कलाकारांना व्यासपीठ देणे हीच श्री गणेशाला खरी मानवंदना; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

सोलापूर : कल्पकतेच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या विविध देखाव्यांद्वारे कलाकारांना गणेशोत्सवाच्या काळात आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. ६४ कलांचा अधिपती आणि बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाची हीच खरी आराधना असून, कलाकारांना व्यासपीठ देणे हीच गणेशाला खरी मानवंदना आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले. सोलापूरचे आराध्य दैवत श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या गंगा अवतार’ या देखाव्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

गंगा अवतार’ देखाव्यातून पौराणिक कथेचे सादरीकरण

बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समितीतर्फे दरवर्षी विविध विषयांवर आकर्षक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची परंपरा आहे. यंदा मंडळाने गंगा अवतार’ हा पौराणिक देखावा साकारला आहे. या देखाव्यात भगवान शंकरांनी आपल्या जटेत गंगेला धारण करून तिचा प्रवाह पृथ्वीवर आणल्याचे दृश्यात्मक आणि कलात्मक सादरीकरण करण्यात आले आहे. आकर्षक आरास, प्रकाशयोजना आणि कलात्मक मांडणीच्या माध्यमातून गंगा अवतरणाची पौराणिक कथा भाविकांसमोर साकारण्यात आली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी उत्सव अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, मल्लिनाथ खुने, राजशेखर हिरेहब्बू, शिवशंकर कोळकूर, केदार मेंगाणे, उत्सव उपाध्यक्ष सुभाष गुंदगी, उत्सव सचिव शिवानंद सोन्ना, पुष्कराज मेत्री, मल्लिनाथ मसरे, बाळासाहेब भोगडे, गुरुलिंग समाणे, रामचंद्र जोशी, शिवानंद बुगडे, बिप्पीन धुम्मा, सुधीर थोबडे, अमित गुंगे, सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे, प्रविण वाले, नागनाथ मेंगाणे, विकास धुम्मा, आनंद मुस्तारे, कैलास मेंगाणे, शशिकांत बिराजदार, लक्ष्मण भाईकट्टी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कणकी यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुरुशांत मोकाशी यांनी केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.