थांबलेल्या पिकअपला दुचाकीची जोरदार धडक; वडील आणि चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर
सांगली : तासगाव-मनेराजुरी रस्त्यावर वासुंबे हद्दीतील ब्रम्हनाथ मंदिराजवळ
भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीने पाठीमागून
जोरदार धडक दिल्याने वडील आणि त्यांच्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीचा जागीच
मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांची
प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सागर जाधव (रा.
चिंचणी) आणि त्यांची चार वर्षीय मुलगी हर्षिता यांचा मृत्यू झाला. तर
पत्नी सोनाली जाधव या गंभीर जखमी झाल्या आहेत.
नेमका कसा झाला अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सागर जाधव हे पत्नी सोनाली आणि मुलगी हर्षिता यांना
घेऊन दुचाकीवरून तासगाव-मनेराजुरी रस्त्यावरील आयडियल इंग्लिश स्कूल परिसरातून
तासगावच्या दिशेने जात होते. यावेळी वासुंबे हद्दीतील ब्रम्हनाथ मंदिराजवळ रस्त्याच्या
कडेला थांबलेल्या पिकअप वाहनाला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की सागर जाधव आणि त्यांची चार वर्षीय मुलगी हर्षिता यांचा
घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी
गर्दी केली. गंभीर जखमी झालेल्या सोनाली जाधव यांना तातडीने उपचारासाठी मिरज
येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे
सांगण्यात येत आहे.
तासगाव परिसरात हळहळ
सागर जाधव हे तासगाव तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष तसेच
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बाबुराव जाधव यांचे पुत्र असल्याची
माहिती आहे. तर सोनाली जाधव या मनेराजुरी येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत
आहेत. एका कुटुंबातील वडील आणि चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिंचणीसह
तासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही या
घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रस्त्याच्या कडेला वाहन कोणत्या परिस्थितीत उभे होते आणि दुचाकीची धडक नेमकी कशी
झाली, याबाबतची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.