तिबेटमध्ये हिमनदीचा प्रलय? नेपाळमध्ये भीषण महापूर; १ हजार जण वाहून गेल्याचा दावा अपुष्ट
नेपाळ : चीनलगतच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या
भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. तिबेटच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी
भोटेकोशी नदीत दाखल झाल्यानंतर तिमुरे, स्याफ्रुबेसी आणि आसपासच्या परिसराला
पुराचा तडाखा बसला.
पुरामुळे बाजारपेठा, घरे, रस्ते आणि पूल
यांचे मोठे नुकसान झाले आहे. तिमुरे परिसरात तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे नऊ
कर्मचारी संपर्काबाहेर असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले
आहे. दरम्यान, सोशल मीडिया आणि काही अनधिकृत माध्यमांमध्ये ‘एक हजार लोक वाहून गेले’ असा दावा केला जात आहे.
मात्र, मृत किंवा बेपत्ता नागरिकांचा अधिकृत आकडा अद्याप
समोर आलेला नसल्याने हा दावा सध्या अपुष्ट आहे. या पुराचा फटका नेपाळच्या
जलविद्युत प्रकल्पांनाही बसला आहे. रसुवागढी, चिलिमे आणि
त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पांसह २२० केव्ही सबस्टेशन आणि इतर वीज पायाभूत
सुविधांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. काही भागांतील वीजपुरवठाही विस्कळीत झाला
आहे.
पूराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिबेटमध्ये
हिमनदीतील तलाव फुटल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात पाणी नेपाळमध्ये आले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या शक्यतेला
अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पुराचे पाणी पुढे नुवाकोट आणि धादिंगच्या
दिशेने पोहोचले असून त्रिशूली नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. नेपाळ
सरकारने लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाला
बचावकार्यासाठी तैनात केले असून हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू
आहे.
परिस्थिती गंभीर असून मृत, बेपत्ता आणि नुकसानीचा अंतिम आकडा अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.