लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलैचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात, असे तपासा पेमेंट स्टेटस
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै
महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून पात्र
महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील
दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पैसे जमा न झाल्यास काय कराल?
काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप निधी जमा झाला
नसेल, तर त्यांनी सर्वप्रथम बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे का,
तसेच योजनेची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
ई-केवायसी कशी तपासायची?
1.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर
जा.
2.
‘ई-केवायसी’ या
पर्यायावर क्लिक करा.
3.
आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून पुढील प्रक्रिया सुरू करा.
4.
आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला OTP नोंदवा.
5.
आवश्यक माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
6.
ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्याची स्थिती पुन्हा तपासा.
7.
बँक खाते आधारशी लिंक नसेल, तर संबंधित बँकेशी संपर्क साधून आधार
सीडिंग करून घ्या.
DBT स्थितीही तपासा
ई-केवायसी पूर्ण असूनही पैसे जमा होत नसतील, तर योजनेच्या पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासावी. त्यासोबतच बँक खाते सक्रिय
आहे का, आधार लिंक आहे का आणि DBT (Direct Benefit
Transfer) सुरू आहे का, याची खात्री करणे
महत्त्वाचे आहे.जुलै महिन्याचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने
राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, निधी जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्याने खात्यात रक्कम
दिसण्यासाठी काही वेळ लागू शकतो.