शेळगी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या निवृत्त शिक्षिकेचा अपघाती मृत्यू
सोलापूर, दि. २५ : पुणे-हैदराबाद महामार्गावरील
मार्केट यार्डसमोरील मित्रनगर कॉर्नर, शेळगी परिसरात रस्ता ओलांडताना
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निवृत्त शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुवर्णा राजेंद्र बिराजदार (वय ५६, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. सुवर्णा बिराजदार या मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मार्केट यार्डसमोरील मित्रनगर
कॉर्नर येथे त्या रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक
दिली.
डोक्याला आणि पायाला गंभीर
दुखापत
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिराजदार
यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्या बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर
पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी
तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जखमी बिराजदार यांना उपचारासाठी रुग्णालयात
दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत
घोषित केले.
पाच वर्षांपूर्वी झाल्या होत्या
निवृत्त
सुवर्णा बिराजदार या भवानी
पेठेतील वीर तपस्वी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सुमारे पाच
वर्षांपूर्वी त्या सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू
या अपघातप्रकरणी मृत
शिक्षिकेच्या मुलाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
आहे. दरम्यान, सकाळच्या वेळी या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.