मुंबईत बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीवरून अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव
मुंबईतील माझगाव परिसरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याचा आरोप झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘माझगावचा मौर्य’ गणपती मंडळाची आगमन मिरवणूक सुरू असताना जवळील एका इमारतीवरून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मंडळाच्या माहितीनुसार, मिरवणुकीच्या मार्गापासून सुमारे ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या इमारतीतून हा प्रकार घडला. घटनेनंतर मिरवणुकीतील भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. त्यातून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली.
परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आणि दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, अंडी नेमकी कोणी आणि कुठून फेकली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.