इन्स्टाग्रामवरील प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट; २७ वर्षीय तरुणाची मारहाणीत हत्या, दोघांना अटक
सोलापूर : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात
झाल्यानंतर एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर
आली आहे. तरटगाव येथील ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के याची तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील ४२ वर्षीय
विवाहित महिलेशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फोनवरून संवाद
सुरू होता. एप्रिलमध्ये संबंधित महिला अरविंदच्या घरी आली होती. त्यानंतर ती
पुन्हा त्याच्याकडे आली आणि लग्न करण्याचा आग्रह करत असल्याची माहिती समोर आली
आहे.
महिला पतीला सोडून अरविंदकडे आली
सुमारे दीड महिन्यापूर्वी महिला
पुन्हा अरविंदकडे आली आणि सासरी जाण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. तिचा पती
तिला घेण्यासाठी आला असता तिने जाण्यास नकार देत टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी
दिल्याची माहिती आहे. नंतर महिला पुन्हा पतीच्या घरी
गेली. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी अरविंदने आईला
महिला भेटण्यासाठी बोलावत असल्याचे सांगितले होते.
महिलेला भेटण्यासाठी गेला अन्
मारहाण
१५ ऑगस्ट रोजी अरविंद महिलेला
भेटण्यासाठी घराबाहेर पडला. आरोपानुसार, महिलेचा पती, मुलगा आणि अन्य काही जणांनी त्याला बेदम मारहाण केली. या
हल्ल्यात अरविंद गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तामलवाडी पोलिस
ठाण्यात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांनी अरविंदला उपचारासाठी
सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
उपचारादरम्यान मृत्यू
मात्र, उपचार सुरू असताना २२ ऑगस्ट रोजी अरविंद मस्केचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अरविंदच्या आईने तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत. इन्स्टाग्रामवरील ओळखीपासून सुरू झालेल्या या प्रकरणाचा शेवट तरुणाच्या मृत्यूने झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.