एकनाथ शिंदेंना धक्का; शिवसेनेतील पाच महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ

अहिल्यानगर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. पक्षात सामाजिक कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदारांचे प्राबल्य वाढल्याचा गंभीर आरोप करत महिला आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या सामूहिक राजीनाम्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उत्तर विभाग महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यांच्यासोबत शहर संघटिका कमल नरोडे, उपशहरप्रमुख उर्मिला लोळगे, विभागप्रमुख रुपाली महाडिक आणि प्रिती शिंदे यांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

१ टक्का कार्यकर्ते, ९९ टक्के ठेकेदार’

विमल पुंडे यांनी राजीनामा पत्रातून पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात केवळ १ टक्का सामाजिक कार्यकर्ते असून ९९ टक्के ठेकेदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्वार्थासाठी अनेकजण पक्षात दाखल झाले असून, अशा वातावरणात काम करणे त्रासदायक ठरत असल्याचे पुंडे यांनी म्हटले आहे. पक्षाची खरी ताकद निष्ठावान शिवसैनिक असूनही काही पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे सर्वसामान्यांमध्ये पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शिर्डीतील घटनेवरून नाराजी

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी केलेला गोंधळ पक्षहितासाठी नव्हे, तर व्यक्तिगत स्वार्थासाठी होता, असा आरोप पुंडे यांनी केला आहे. या घटनेनंतर महिला पदाधिकाऱ्यांना पक्षात काम करणे अवघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता असल्याने आपण आणि इतर महिला पदाधिकारी पक्षाच्या बैठका व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला जय महाराष्ट्र’

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार अपेक्षित पद्धतीने पक्षाचे काम होत नसल्याची नाराजीही विमल पुंडे यांनी व्यक्त केली. संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक बळ दिले जात असले तरी त्यातून पक्षविस्ताराऐवजी गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. स्वाभिमान जपण्यासाठी पक्षापासून दूर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगत त्यांनी ‘शिवसेनेला जय महाराष्ट्र’ अशी भूमिका घेतली आहे.

३४ वर्षांची शिवसेनेतील वाटचाल

विमल पुंडे यांनी १९९२ पासून तब्बल ३४ वर्षे शिवसेनेत काम केल्याचे सांगितले आहे. महिला आघाडीच्या पदाधिकारी ते नगरसेविका असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सर्वसामान्य परिस्थितीतून राजकारण करताना साखर सम्राटांना आव्हान देत निवडणूक लढवल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. पाच महिला पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने अहिल्यानगरमधील शिंदेसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सामूहिक राजीनाम्यांवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.