साखरेचे वाढलेले दर लवकरच कमी होणार; ISMA चा मोठा दावा

नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढलेल्या दराचा महागाईचा फटका बसत असताना, देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा साखर उद्योगाची सर्वोच्च संघटना इंडियन शुगर अँड मिल्स असोसिएशन अर्थात ISMAने केला आहे. किरकोळ बाजारातील साखरेचे वाढलेले दर लवकरच कमी होण्याची शक्यता असल्याचे ISMAचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी सोमवारी सांगितले. व्यापारी आणि मोठ्या ग्राहकांकडून झालेली सट्टेबाजीची खरेदी तसेच खराब हवामानामुळे साखर उत्पादनात झालेली घट यामुळे दर वाढल्याचे शिरगावकर यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम टंचाईचा आरोप फेटाळला

पत्रकार परिषदेत बोलताना नीरज शिरगावकर यांनी साखर कारखान्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून कारखाना पातळीवरील अर्थात एक्स-मिल दर वाढवण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावला. केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्यानंतर साखरेच्या दरात घट होण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. देशात साखरेचा तुटवडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरअखेर ३५ लाख टन साठ्याचा अंदाज

ISMAच्या अंदाजानुसार, सप्टेंबरअखेर देशात सुमारे ३५ लाख टन साखरेचा शिल्लक साठा राहण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांचे आगामी गाळप हंगामातील कामकाज सुमारे १५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये १० ते १२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात देशातील साखरेची मागणी सुमारे २४ ते २५ लाख टन राहण्याचा अंदाज ISMAने व्यक्त केला आहे.

महिनाभरात ४२ रुपयांवरून ८० रुपयांवर

दरम्यान, गेल्या महिनाभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. सुमारे ४२ रुपये किलो दराने मिळणारी साखर काही बाजारपेठांमध्ये आता थेट ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. साखरेच्या दरवाढीवरून सोशल मीडियावरही विविध मीम्स आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ISMAच्या दाव्यानुसार शुल्कमुक्त कच्च्या साखरेची आयात आणि आगामी गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारातील पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे दर स्थिर होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.