यवतमाळच्या टिपेश्वरमधून निघालेल्या तीन वर्षीय नर वाघाचा तब्बल ५५० किमीचा प्रवास; पाच जिल्हे पार करत अखेर बीडच्या आष्टी जंगलात दाखल
यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव
अभयारण्यात जन्मलेल्या एका तीन वर्षीय नर वाघाने नवीन अधिवास आणि अन्नाच्या शोधात
तब्बल ५५० किलोमीटरचा प्रवास केला आहे. पाच जिल्ह्यांमधून भ्रमंती करत अखेर हा वाघ
बीड जिल्ह्यातील आष्टी वनपरिक्षेत्रातील देवळाली-वेलतुरीच्या जंगल परिसरात पोहोचला
आहे. ‘टी-२२’ या वाघिणीच्या पोटी २०२२
मध्ये या वाघाचा जन्म झाला. नवीन क्षेत्राच्या शोधात त्याने डिसेंबर २०२४ मध्ये
धाराशिव येथील येडशीच्या रामलिंग अभयारण्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने बार्शी, सोलापूर, लातूर, अहिल्यानगर आणि आता बीड असा मोठा प्रवास केला. फेब्रुवारी २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत
परिसरात या वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर काही काळ त्याचा ठावठिकाणा लागला
नव्हता. अखेर ३ ऑगस्ट रोजी आष्टी तालुक्यातील
देवळाली-वेलतुरी जंगलात त्याच्या हालचालींच्या खुणा वन विभागाला आढळल्या. या परिसरात वाघाच्या हालचालींची नोंद घेण्यासाठी वन
विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवले होते. २० ऑगस्ट रोजी हा पट्टेदार वाघ
कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे त्याच्या आष्टी
परिसरातील वास्तव्याला पुष्टी मिळाली.
५ जिल्ह्यांतून ५५० किमीचा
प्रवास
या वाघाने धाराशिवपासून सोलापूर, लातूर, अहिल्यानगर आणि बीडपर्यंत मोठी
भ्रमंती केली आहे. योग्य अधिवासाच्या शोधात त्याचा हा प्रवास सुरू असल्याचे वन
विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, आष्टी परिसरात या वाघाने काही जनावरांवर हल्ला
केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने परिसरातील नागरिकांना
सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वाघाच्या हालचालींवर ट्रॅप
कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.
५५० किलोमीटरचा हा प्रवास
वन्यजीव अभ्यासकांसाठीही महत्त्वाचा ठरत असून, योग्य अधिवासाच्या शोधात वाघांची होणारी स्थलांतराची
क्षमता यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.