मुस्लिम महिलांसाठी हिजाब अनिवार्य धार्मिक प्रथा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

प्रयागराज येथील टागोर पब्लिक स्कूलमधील एका विद्यार्थिनीने शालेय गणवेशासोबत हिजाब म्हणजेच डोक्यावर स्कार्फ परिधान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ही मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती जे. जे. मुनीर आणि न्यायमूर्ती इंद्रजित शुक्ला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने शाळेतील विविध वर्गांमधील विद्यार्थ्यांची छायाचित्रे पाहिली. त्यावेळी संबंधित समुदायातील इतर कोणतीही विद्यार्थिनी अशा प्रकारचा स्कार्फ परिधान करत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

हिजाब किंवा स्कार्फ परिधान करणे हा मुस्लिम धर्माचा अनिवार्य अथवा मूलभूत भाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस कायदेशीर किंवा वस्तुनिष्ठ पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही, असे खंडपीठाने नमूद केले. हिजाब न परिधान केल्यामुळे एखाद्या मुस्लिम महिला किंवा मुलीच्या धार्मिक अस्तित्वाला किंवा श्रद्धेला बाधा पोहोचते, असे सिद्ध झालेले नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निरीक्षणाच्या आधारे शालेय गणवेशासोबत स्कार्फ घालण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळण्यात आली.