बस स्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; ‘नवीन बस नको, आधी सुविधा चांगल्या द्या’ प्रवाशांची मागणी

सोलापूर : सोलापूर शहरातील बस स्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, जी. एम. चौक ते सोलापूर बस स्थानक या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने एसटी बसची ये-जा होत असल्याने खड्ड्यांमुळे चालकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जी. एम. चौकापासून बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर एसटी बसेसची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना सतत कसरत करावी लागत आहे. विशेषतः एसटी बस चालकांना खड्डे चुकवत वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांना धक्के; अपघाताचा धोका

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बसमधील प्रवाशांना मोठे धक्के बसत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या आणि सतत वर्दळीच्या परिसरातील रस्त्यांची अशी दुरवस्था असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.

नवीन एसी बस नको, आधी रस्ते चांगले द्या’

दरम्यान, नागरिकांकडून नवीन एसी बस नको, आधी रस्ते आणि मूलभूत सुविधा चांगल्या द्या” अशी मागणी केली जात आहे. बस स्थानक परिसरात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असल्याने या मार्गाची तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांमधून जोर धरत आहे.