सोलापुरात बारदाना गोदामाला भीषण आग; २५ बंबांच्या पाण्याच्या माऱ्यानंतर साडेतीन तासांनी आग आटोक्यात

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सुनील नगरजवळील गणेश नगर परिसरात बारदाना गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. एस.पी. एंटरप्राइजेस या गोदामाला सायंकाळी सुमारे सहा वाजता अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे काळे धुराचे लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे, उपअधीक्षक अच्युत दुध्याळ यांच्यासह जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन सोलापूर शहरातील सातही अग्निशामक केंद्रांमधून पाण्याच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

२५ बंबांच्या पाण्याचा मारा

अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल २५ गाड्यांमधून पाण्याचा मारा करत सुमारे साडेतीन तास अथक प्रयत्न केले. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

गोदाम मालकांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात बारदान्याचे नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आल्यानंतरही अग्निशामक दलाकडून रात्री उशिरापर्यंत कुलिंगचे काम सुरू होते.