कोल्हापूरकरांनो, पाण्याची चिंता मिटली! चार वर्षांनंतर काळम्मावाडी धरण जवळपास फुल्ल

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण पाणीसाठ्यामुळे चर्चेत असलेले काळम्मावाडी धरण अखेर जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीतील गळतीमुळे २०२२ नंतर जाणीवपूर्वक धरणातील पाणीसाठा कमी ठेवण्यात येत होता. मात्र, यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे बुधवारी सकाळी १० वाजता धरणात ९९.९० टक्के पाणीसाठा झाला. धरणातील पाणीसाठा वाढल्याने कोल्हापूर शहरासह लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विद्युत निर्मितीसाठी धरणातून सध्या १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

चार वर्षांनंतर धरण जवळपास फुल्ल

काळम्मावाडी हा आंतरराज्य प्रकल्प आहे. धरणाच्या मुख्य भिंतीला गळती लागल्याने २०२२ नंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत नव्हता. यंदा गळती काढण्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने यावर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसंचय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली.

२५.३६ टीएमसी पाणीसाठा

काळम्मावाडी धरणाची पाणीपातळीची कमाल क्षमता ६४६ मीटर, तर पाणीसाठ्याची क्षमता २५.३९ टीएमसी इतकी आहे. बुधवारी सकाळी १० वाजता धरणाची पाणीपातळी ६४५.९८ मीटर झाली असून, धरणात २५.३६ टीएमसी म्हणजेच ९९.९० टक्के पाणीसाठा झाला आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गेल्या चार वर्षांपासून धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने उन्हाळ्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. काळम्मावाडी धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही गावांमधील शेती अवलंबून आहे. त्यामुळे धरण जवळपास पूर्ण भरल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शहराचा पाणीप्रश्नही सुटणार

काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या उन्हाळ्यात धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे हा पुरवठा खंडित झाला होता. आता धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने आगामी उन्हाळ्यात कोल्हापूर शहराला पाइपलाइनद्वारे अखंडित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. चार वर्षांनंतर काळम्मावाडी धरणाने गाठलेली जवळपास पूर्ण पाणीपातळी ही कोल्हापूरसाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.