इस्रोने LVM3 रॉकेटद्वारे अमेरिकेच्या AST SpaceMobile चा ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आज
सकाळी ८:५५ वाजता अमेरिकन कंपनी AST SpaceMobile च्या ब्लूबर्ड ब्लॉक-२
कम्युनिकेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोच्या सर्वात शक्तिशाली LVM3
रॉकेटचा (LVM3-M6) वापर करून हे अभियान पार
पाडण्यात आले असून, ही रॉकेटची सहावी ऑपरेशनल फ्लाइट ठरली
आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) आणि AST
SpaceMobile यांच्यात झालेल्या व्यावसायिक करारानुसार हे मिशन
राबवण्यात आले आहे. या प्रक्षेपणाद्वारे जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण
उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये तैनात केला जाणार असून,
थेट सामान्य स्मार्टफोनवरून हाय-स्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध होणार
आहे. ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा AST SpaceMobile च्या पुढील
पिढीतील संप्रेषण उपग्रह मालिकेचा भाग आहे. हा उपग्रह दुर्गम भाग, पर्वतीय क्षेत्रे, महासागर आणि जिथे ग्राउंड नेटवर्क
उपलब्ध नाही अशा ठिकाणी मोबाइल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
या उपग्रहाचे वजन सुमारे ६१०० ते ६५०० किलोग्रॅम असून, भारतीय
भूमीवरून LVM3 द्वारे सोडण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात
वजनदार पेलोड आहे. या उपग्रहामध्ये सुमारे २२३ चौरस मीटरचा (सुमारे २,४०० चौरस फूट) फेज्ड अॅरे अँटेना असून, तो कमी
पृथ्वीच्या कक्षेत तैनात करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण
उपग्रह मानला जात आहे. ब्लूबर्ड ब्लॉक-२ ४G आणि ५G नेटवर्कला समर्थन देतो तसेच प्रति कव्हरेज सेल १२० Mbps पर्यंतचा पीक डेटा स्पीड प्रदान करतो. यामुळे व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, स्ट्रीमिंग आणि डेटा सेवा थेट
अवकाशातून शक्य होणार आहेत. हा उपग्रह सुमारे ६०० किलोमीटर उंचीवर लो अर्थ
ऑर्बिटमध्ये तैनात केला जाईल. याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीने ब्लूबर्ड १ ते ५
उपग्रह प्रक्षेपित केले होते. ब्लूबर्ड ब्लॉक-२ मध्ये त्यापेक्षा सुमारे १० पट
अधिक बँडविड्थ क्षमता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, LVM3 रॉकेट हे इस्रोचे पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तीन-टप्प्यांचे
रॉकेट आहे. ४३.५ मीटर उंचीचे आणि ६४० टन वजनाचे हे रॉकेट ८,०००
किलोपर्यंत पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यास सक्षम आहे. यापूर्वी LVM3 द्वारे चंद्रयान-२, चंद्रयान-३ तसेच वनवेबचे अनेक
उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोच्या जागतिक व्यावसायिक
प्रक्षेपण सेवांना मोठे बळ मिळाले असून, भारताची अंतराळ क्षेत्रातील
विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे. AST SpaceMobile चे
अंतराळ-आधारित सेल्युलर ब्रॉडबँड नेटवर्क भविष्यात स्टारलिंकसारख्या सेवांना थेट
स्पर्धा देणार आहे.