महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात; जागावाटपावर राजकीय पेच कायम
मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक
निकालानंतर आता महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मंगळवार, २३ डिसेंबरपासून मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज
भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला
आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली तरी महायुती आणि
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अद्यापही पेच कायम आहे. जागावाटप अंतिम
टप्प्यात असल्याचे दावे केले जात असले तरी कोणत्याही महापालिकेबाबत सत्ताधारी
किंवा विरोधकांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिकेत काँग्रेसने
स्वबळावर लढण्याचा नारा दिला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काँग्रेसचे मन
वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली
यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही युती-आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबईसह
बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात
आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. ठाणे
जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेतील युतीबाबत अद्याप निर्णय
झालेला नाही.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबतच्या
चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अधिकृत घोषणा अद्याप
झालेली नाही. मुंबई महापालिका निवडणूक राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत
महत्त्वाची मानली जात असून सर्व पक्षांची रणनीती निर्णायक ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम:
- अर्ज भरण्यास
प्रारंभ : २३ डिसेंबर
- अर्ज भरण्याची अंतिम
मुदत : ३० डिसेंबर
- अर्जांची छाननी : ३१
डिसेंबर
- अर्ज मागे घेण्याची
अंतिम मुदत : २ जानेवारी २०२६
- चिन्हवाटप व अंतिम
उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६
- मतदान : १५ जानेवारी
२०२६
- मतमोजणी : १६
जानेवारी २०२६
राज्य निवडणूक आयोगाने संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज दाखल
करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी, राजकीय पक्षांच्या मागणीनुसार महापालिका
निवडणुकीसाठी ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.