बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच; चितगावमध्ये हिंदूंची घरे जाळल्याचा धक्कादायक प्रकार

चितगाव : बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना अजूनही सुरू असून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी चितगाव परिसरातील हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे त्या भागातील भयावह परिस्थिती उघडकीस आली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जयंती संघा आणि बाबू शुकुशील अशी पीडितांची नावे आहेत. घटनेच्या वेळी हे कुटुंब घरातच होते. सर्व दरवाजे बंद असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्यांना कुंपण तोडून बाहेर पळावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. उपजिल्हा कार्यकारी अधिकारी (यूएनओ) एस.एम. राहतुल इस्लाम आणि सहाय्यक आयुक्त (जमीन) ओंगचिंग मार्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाकडून पीडित कुटुंबांना २५ किलो तांदूळ, ५ हजार रुपये रोख मदत आणि ब्लँकेट देण्यात आले आहेत. दरम्यान, १९ डिसेंबर रोजी लक्ष्मीपूर सदर येथे आणखी एक भीषण घटना घडली. काही हल्लेखोरांनी एका हिंदू कुटुंबाच्या घराला बाहेरून कुलूप लावून पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत ७ वर्षांच्या चिमुकलीचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर भाजले. ही घटना पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी १८ डिसेंबर रोजी ढाकाजवळील भालुका येथे दीपू चंद्रा या हिंदू तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप केला होता. दीपू एका कापड कारखान्यात काम करत होता. फेसबुकवरील कथित पोस्टवरून आरोप करण्यात आला असला तरी तपासात अशा कोणत्याही पोस्टचा पुरावा आढळलेला नाही. कारखान्यातील वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या सतत घडणाऱ्या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समाजात भीतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या अत्याचारांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.