२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन : ग्राहक संरक्षण व जागरूकतेचा कणा

समाजातील प्रत्येक जण हा ग्राहक असतो, ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूची किंवा सेवेची किंमत मोजतो व त्याचा वापर करतो तेव्हा आपण ग्राहक बनतो. या ग्राहकांसाठी  दरवर्षी २४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. हा दिवस ग्राहकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच ग्राहक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या संदर्भात आपण जागतिक संदर्भ घेतल्यास जॉन.एफ.केनेडी, अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष, यांनी ग्राहकांना दिलेल्या संदेशात ग्राहकाचे ६ अधिकारस्पष्ट केले.पुढे त्यातून अमेरिकेत संघटित ग्राहक चळवळ उभी राहिली व जगात इतरत्र  पसरली. यावर आधारित भारतात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये  हेच अधिकार देण्यात आले आहेत, या नुसार २४ डिसेंबर १९८६ रोजी भारतात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ लागू झाला. या कायद्यामुळे प्रथमच ग्राहकांना कायदेशीर संरक्षण मिळाले. ग्राहक संरक्षण म्हणजे ग्राहकाचे हक्क व हितसंबंधाचे संरक्षण होय.  आजच्या उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची प्रचंड विविधता दिसून येते. अशा परिस्थितीत ग्राहक अनेकदा चुकीच्या जाहिराती, भेसळ, निकृष्ट दर्जाच्या वस्तू, जास्त दर आकारणी, ऑनलाईन फसवणूक, तसेच विक्रीपश्चात सेवांमधील त्रुटींना बळी पडतो. त्यामुळे ग्राहक हक्कांची माहिती असणे आणि त्यांचा प्रभावी वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.ग्राहकांचे मूलभूत हक्क १.सुरक्षिततेचा हक्क म्हणजे आरोग्य आणि जीवनाला धोका पोहोचवणाऱ्या वस्तू व सेवांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क. २.माहितीचा हक्क यात वस्तू किंवा सेवेचा दर्जा, किंमत, घटक, उत्पादन तारीख, वापर पद्धत याबाबत संपूर्ण आणि खरी माहिती मिळण्याचा हक्क. ३.निवडीचा हक्क यामध्ये स्पर्धात्मक किंमतीत  विविध पर्यायांमधून निवड करण्याचा हक्क. ४.ऐकून घेतले जाण्याचा हक्क यात  ग्राहकांच्या तक्रारी, सूचना आणि समस्या संबंधित प्राधिकरणांनी गांभीर्याने ऐकून घेण्याचा हक्क. ५.तक्रार निवारणाचा हक्क यानुसार ग्राहकास  फसवणूक किंवा अन्याय झाल्यास नुकसानभरपाई व न्याय मिळण्याचा हक्क. ६.ग्राहक शिक्षणाचा हक्क यामध्ये योग्य ग्राहक बनण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान,कौशल्य  कर्तव्ये आणि कायदेशीर प्रक्रिया जाणून घेण्याचा हक्क.

         ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या जागी सुधारित ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ लागू करण्यात आला. या कायद्यानुसार ई-कॉमर्स व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात आले.तसेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण २०२० ची स्थापना करण्यात आली.या कायद्या नुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई तरतूद करण्यात आली. ऑनलाईन तक्रार नोंदणी व जलद निवारण व्यवस्था यामुळे ग्राहकांना अधिक प्रभावी संरक्षण मिळाले.

       केंद्र व राज्य शासनामार्फत ग्राहक न्याय मंच, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन १९१५, ई-दाखिल पोर्टल, तसेच विविध जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात. “जागो ग्राहक जागो” हा उपक्रम ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करतो. हक्कांसोबतच ग्राहकांनी स्वतःची कर्तव्येही ओळखणे गरजेचे आहे. ग्राहकांनी खरेदी करताना बिल व पावती घेणे,उत्पादनावरील माहिती काळजीपूर्वक वाचणे,भेसळ व फसवणूक आढळल्यास तक्रार करणे,पर्यावरणपूरक व जबाबदार खरेदी करणे.  राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था, स्वयंसेवी संघटना यांच्यामार्फत व्याख्याने, चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, जनजागृती रॅली आयोजित केल्या जातात. यामागचा उद्देश म्हणजे जागृत, सजग आणि जबाबदार ग्राहक घडवणे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, प्रत्येक नागरिकाने स्वतःचे हक्क ओळखून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जागृत ग्राहक हीच सशक्त अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे, म्हणूनच ग्राहक जागरूकता ही काळाची गरज आहे.

     लेखक:

युवराज सोलापुरे
सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
मो. नं. ८८८८७२६६३७