रेणापूरमध्ये पराभूत उमेदवाराकडून वृद्ध महिलेला मारहाण; मतदान न केल्याचा आरोप
रेणापूर : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे
निकाल नुकतेच जाहीर झाले. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला असताना, काही ठिकाणी पराभवाची खदखद हिंसक स्वरूपात समोर येत आहे. रेणापूर
नगरपंचायत निवडणुकीनंतर अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पराभूत भाजप उमेदवाराने मतदान न केल्याच्या कारणावरून एका वृद्ध महिलेला
मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ काँग्रेस नेते धीरज
देशमुख यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर केला असून, त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी
असून माणुसकीला काळीमा फासणारी आणि लोकशाही मूल्यांना घातक आहे,” असे म्हणत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी
त्यांनी केली आहे. पीडित वृद्ध महिला पारूबाई बाबू राठोड यांनी दिलेल्या
माहितीनुसार, “मतदान का केले नाही” असा जाब विचारत उत्तम
चव्हाण नावाच्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली. तसेच ‘हिला खल्लासच करू’ अशी धमकी
दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. महिलेला बोलताही येत नव्हते, इतकी मारहाण करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या
प्रकरणी रेणापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या हिंसक घटना लोकशाहीसाठी
गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, पोलिसांकडून कोणती कारवाई केली
जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.