२०२६ मध्ये महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदार निवृत्त, शरद पवारांचाही समावेश

२०२५ हे वर्ष राजकीय घडामोडींनी गाजलेले असतानाच २०२६ हे वर्ष देखील भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी वर्षात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून त्याचबरोबर राज्यसभेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील एकूण २४५ खासदारांपैकी तब्बल ७१ खासदारांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार असून ते निवृत्त होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, देशाच्या राजकारणातील मोठे नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील याच यादीत आहेत. सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे महाराष्ट्रातील हे सातही राज्यसभा खासदार २ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्रातील निवृत्त होणारे राज्यसभा खासदार

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये –

  • केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,
  • भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड,
  • खासदार धैर्यशील मोहिते पाटील,
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी,
  • काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील,
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान,
  • तसेच शरद पवार यांचा समावेश आहे.

देशभरातील ७१ खासदार निवृत्त

२०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या ७१ खासदारांपैकी –

  • मार्च महिन्यात १,
  • एप्रिलमध्ये ३७,
  • जूनमध्ये २२,
  • तर नोव्हेंबरमध्ये ११ खासदार निवृत्त होणार आहेत.

यामध्ये भाजपचे सर्वाधिक ३० खासदार निवृत्त होत असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचाही समावेश आहे. याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल, अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, डीएमके नेते तिरुची शिवा यांचाही कार्यकाळ संपणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का?

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या नामनिर्देशित कोट्यातून निवड झालेले माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही कार्यकाळ मार्च २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या जागांवर कोणत्या नेत्यांना संधी मिळते आणि नव्या चेहऱ्यांना प्रवेश मिळतो का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.