नेपाळमध्ये मोठा अनर्थ टळला : भद्रपूर विमानतळावर बुद्धा एअरचे विमान धावपट्टीवरून घसरले .
नेपाळमधील भद्रपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री एक मोठी विमान
दुर्घटना टळली. काठमांडूवरून ५५ प्रवाशांना घेऊन आलेले बुद्धा एअरचे विमान
लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून पुढे घसरल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक
घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धा एअरचे ‘फ्लाइट
९०१’ हे विमान शुक्रवारी रात्री ८:२३ वाजता काठमांडूहून भद्रपूरकडे रवाना झाले
होते. रात्री सुमारे ९:०८ वाजता विमान भद्रपूर विमानतळावर उतरत असताना, टचडाऊननंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान वेगात पुढे सरकत
धावपट्टी सोडून जवळपास २०० मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात जाऊन थांबले. अचानक
झालेल्या या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र
वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण ठेवले.
प्रवाशांचा जीव भांड्यात
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रिंजी शेरपा यांनी
दिलेल्या माहितीनुसार, विमानात एकूण ५५ प्रवासी आणि ४ क्रू
मेंबर्स होते. विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि
आपत्कालीन यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून
बाहेर काढण्यात आले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेत विमानाचे
किरकोळ नुकसान झाले असून ते दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे.
तांत्रिक पथकाकडून तपास सुरू
या घटनेनंतर झापा जिल्ह्याचे मुख्य अधिकारी शिवराम गेलल यांनी
घटनास्थळाची पाहणी केली. बुद्धा एअरकडून काठमांडूहून एक विशेष तांत्रिक पथक
भद्रपूरला पाठवण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण
शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. हे विमान त्या दिवसातील शेवटचे उड्डाण होते आणि
रात्रभर भद्रपूरमध्ये थांबून शनिवारी सकाळी पुन्हा काठमांडूला परतणार होते.
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली की हवामानाचा काही परिणाम होता, याचा तपास सुरू आहे. वेळीच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने मोठा अनर्थ टळला असून
सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.