रीलमुळे पुन्हा अडचणीत अथर्व सुदामे, पीएमपीकडून नोटीस जारी
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे पुन्हा एकदा रीलमुळे
अडचणीत सापडला आहे. गणेशोत्सवाच्या काळात एका वादग्रस्त रीलमुळे ट्रोल झाल्यानंतर
आता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) त्याला थेट नोटीस पाठवण्यात आली
आहे.
पीएमपी प्रशासनाने पाठवलेल्या नोटीसमध्ये अथर्व सुदामेने संबंधित
व्हिडीओबाबत लेखी खुलासा सादर करावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच हा व्हिडीओ
तात्काळ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाचे
पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही
देण्यात आला आहे.
नोटीस देण्यामागचं कारण
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व सुदामेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता
पीएमपीच्या बसमध्ये रील शूट केली होती. या व्हिडीओमध्ये महामंडळाचा अधिकृत गणवेश,
ई-तिकीट मशीन तसेच बॅच-बिल्ल्यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आल्याचा
आरोप पीएमपी प्रशासनाने केला आहे. यामुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत असल्याचेही
नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा गैरवापर आणि अधिकृत
साधनांचा परवानगीशिवाय वापर हा गंभीर प्रकार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
याआधीही वादात सापडला होता अथर्व
गणेशोत्सवाच्या काळात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या एका
रीलमुळे अथर्व सुदामेला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
त्यानंतर वाढलेल्या वादामुळे त्याला ती रील हटवावी लागली होती. आता पुन्हा एकदा
रीलमुळेच अथर्व सुदामेची अडचण वाढली असून, यावेळी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आल्याने
हा प्रकार अधिक गंभीर ठरत आहे.