सोलापूरच्या मानाच्या कसबा गणपतीची महापूजा; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विधिवत पूजन, मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ

सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीची चार हुतात्मा पुतळा येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. पारंपरिक धार्मिक वातावरणात आणि भक्तिमय उत्साहात झालेल्या या महापूजेनंतर श्रींच्या मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ झाला. महापौर विनायक कोंड्याल यांनी श्री गणरायाचे पूजन करून सोलापूर शहरातील नागरिकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता लाभावी, तसेच शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रार्थना केली. गणेशोत्सव हा सोलापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सर्व गणेशभक्तांनी हा उत्सव भक्तिभावाने, शिस्तीने आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी केले.

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ

महापूजेनंतर ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीच्या मार्गावर गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. जयघोष आणि पारंपरिक वाद्यांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी ज्येष्ठ विधीतज्ञ मिलिंद थोबडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले, केदार मेंगाणे, उत्सव अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू, ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने, ट्रस्टी सहसचिव शिवशंकर कोळकुर, ट्रस्ट खजिनदार केदार मेंगाणे, तसेच बिपिन धुमा, आनंद मुस्तारे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.