सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाची मेदान्ता रुग्णालयात हलवण्यास मंजुरी
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बेमुदत
उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च
न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदान्ता
रुग्णालयात हलवण्यास मंजुरी दिली आहे. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि
न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान एम्स, सफदरजंग रुग्णालय आणि वांगचुक यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचे अहवाल तपासले.
सर्व डॉक्टरांनी वांगचुक यांच्या प्रकृतीवर सतत वैद्यकीय देखरेख आवश्यक असल्याचे
मत नोंदवले.
यापूर्वी एकेरी पीठाने खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी
फेटाळली होती. त्याविरोधात वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली अंगमो यांनी अपील
दाखल केले होते. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता
यांनी मेदान्ता रुग्णालयात हलवण्यास सरकारची कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय वांगचुक यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊ नये,
अशी अटही सरकारने मांडली. न्यायालयाने आदेश देताना सफदरजंग
रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अहवाल आणि उपचारांची माहिती मेदान्ता रुग्णालयाला
सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वांगचुक यांच्या उपचारांमध्ये
कोणताही अडथळा येणार नाही.