बार्शीत आईकडून १० महिन्यांच्या चिमुकलीची हत्या; 'आई, मला मारू नको' म्हणत मोठ्या मुलीने वाचवला जीव
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात अत्यंत
धक्कादायक घटना घडली असून, एका आईने आपल्या १० महिन्यांच्या
मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी आरोपी
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी पूजा योगेश
खुर्दामळे (वय २६) हिने आपल्या १० महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून तिला पाण्याच्या
बादलीत बुडवून ठार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर ती मृत बालिकेला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली
आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ बालिकेला ग्रामीण रुग्णालयात
दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित
केले. प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःसह दोन्ही
मुलींना संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या
घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे सहा वर्षांच्या मोठ्या मुलीने पोलिसांना
दिलेल्या माहितीनुसार, तिचाही जीव घेण्याचा प्रयत्न झाला
होता. मात्र, "आई, मला मारू
नको... मी चांगली शाळा शिकते, मोठी होईन," अशी विनवणी केल्यानंतर आईने तिला सोडून दिल्याचा आरोप आहे. मोठ्या
मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त
होत आहे.