शिवकुमार ज्वेलर्स लूटप्रकरण उघड; दोन आरोपी अटकेत, ६.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर शहर गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत ७० फूट रोडवरील शिवकुमार
ज्वेलर्समध्ये झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात दोन
आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १३
जून रोजी तीन अज्ञात इसमांनी शिवकुमार ज्वेलर्समध्ये प्रवेश करून पिस्टलचा धाक
दाखवत सोन्याचे दोन नेकलेस लुटून नेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास
सुरू केला.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार केली. तपासादरम्यान शहरातील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.याचवेळी गोपनीय माहितीच्या आधारे चोरीचे नेकलेस विक्रीसाठी दोन संशयित अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जिलानी म. रफिक दामटे (वय ३३) आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल (वय २४) या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे येरवडा, पुणे येथील रहिवासी आहेत. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी रेहान उर्फ जड्डया लडाफ (रा. कलबुर्गी, कर्नाटक) याचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील-सोनवणे तसेच त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली.