मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा; उळे येथे सोलापूर-धुळे महामार्ग रोखून मराठा समाजाचा रास्ता रोको

सोलापूर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहराजवळील तुळजापूर रोडवरील उळे येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. सकाळच्या सुमारास उळे गावासह परिसरातील शेकडो मराठा युवक आणि ज्येष्ठ नागरिक महामार्गावर एकत्र जमले. हातात भगवे झेंडे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाचे पोस्टर घेऊन आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिला. आंदोलनामुळे सोलापूर-धुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलनाला पाठिंबा देत उळे गावातील दुकाने आणि बाजारपेठही बंद ठेवण्यात आली.

घोषणांनी परिसर दणाणला यावेळी आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” तसेच मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

निर्णय होईपर्यंत शांत बसणार नाही’

आंदोलक माऊली पवार यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मात्र सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असल्याचे सांगत आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.