सोलापूर महापालिकेच्या सभेत ‘पाकीट’ शब्दावरून गोंधळ; महापौर विनायक कोंड्याल यांनी शब्द घेतला मागे
सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी
राजकीय वातावरण चांगलेच तापले. महापालिकेच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्याच्या
मुद्द्यावरून सभागृहाबाहेर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते
व कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात आंदोलन केले. दरम्यान, सभागृहात भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी संबंधित विषय मांडला. या विषयाला
काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात समर्थन दिल्याचे चित्र होते. बाहेर मात्र महाविकास
आघाडीतील घटक पक्षांकडून आंदोलन सुरू होते. आंदोलनाकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता
महापौर विनायक कोंड्याल यांनी आंदोलनकर्त्यांबाबत ‘पाकीट
घेऊन आंदोलन करत आहेत’ असा उल्लेख केल्याचे वृत्त आहे.
या शब्दावरून काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमोल
शिंदे यांनी तातडीने आक्षेप घेतला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या
कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारचा शब्दप्रयोग योग्य नसल्याचे सांगत सभागृहात जोरदार
चर्चा आणि गोंधळ झाला. अखेर महापौर विनायक कोंड्याल यांनी ‘पाकीट’ हा शब्द मागे घेत आहोत, असे स्पष्ट करत
वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
बीओटीच्या मुद्द्यावरून आंदोलन
सोलापूर महापालिकेच्या काही मोक्याच्या जागा
भाडेतत्त्वावर किंवा बीओटी तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला गेल्या काही
दिवसांपासून विरोध होत आहे. सुरुवातीला सात जागा बीओटीवर देण्याचा विषय चर्चेत
होता. या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या काही
नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सभागृहाबाहेर
आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सभागृहातील चर्चेपासून ते महापौरांच्या ‘पाकीट’
शब्दापर्यंत या बैठकीची राजकीय चर्चा रंगली.
पुढील राजकीय संघर्षाची शक्यता
‘पाकीट’ या शब्दावरून आता सोलापूरच्या
राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या पक्षांकडून
या मुद्द्यावर पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे
सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.