मंदिरात विजेच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी; ८ महिला भाविकांचा मृत्यू, ९ जण गंभीर जखमी
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील अशोक धाम येथील ऐतिहासिक
इंद्र दमनेश्वर महादेव मंदिराजवळ सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात
विजेचा खांब कोसळल्यानंतर विजेचा धक्का लागल्याची अफवा पसरली आणि भाविकांमध्ये
अचानक घबराट निर्माण झाली. प्राथमिक माहितीनुसार, अशोक धाम रेल्वे स्थानकावर एकाच वेळी दोन
गाड्या दाखल झाल्याने गर्दीत अचानक हालचाल वाढली. काही तरुण धावत सुटल्याने आणि
त्यानंतर विजेचा खांब कोसळल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
दरम्यान, विजेचा धक्का लागल्याची अफवा पसरताच भाविकांनी सैरावैरा पळण्यास सुरुवात केली. याच गोंधळात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ८ महिला भाविकांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे प्राथमिक कारण विजेचा धक्का नसून चेंगराचेंगरी असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेच्या वेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित होता, अशीही माहिती प्रशासनाने दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.