कचरा टाकण्यावरून वादाचा भडका; पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, दोघांचाही मृत्यू
सांगलीच्या कुपवाड परिसरात कचरा टाकण्यावरून झालेल्या किरकोळ वादाला
हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पती-पत्नीचा मृत्यू
झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी कचरा टाकण्यावरून शेजारी
राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख याचा मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर
यांच्यासोबत वाद झाला. या वादातून फरीदने मोहन यांच्या डोक्यात हातोडीने गंभीर वार
केल्याचा आरोप आहे.
पतीला वाचवण्यासाठी मनीषा पुढे आल्या असता त्यांच्यावर चाकूने हल्ला
करण्यात आला. या हल्ल्यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या
मोहन केसरेकर यांच्यावर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र
उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र
पोलिसांनी अवघ्या चार तासांत फरीद अब्दुल शेख याला ताब्यात घेतले. सांगली जिल्हा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
ही कारवाई केली. आता या प्रकरणात दोघांच्या मृत्यूनंतर डबल मर्डरचा गुन्हा दाखल
करण्यात आला असून, कुपवाड एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.