राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर; 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, खेलरत्नसाठी एकही नाव नाही
केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची
घोषणा केली आहे. यंदा विविध क्रीडा प्रकारांतील 17 खेळाडूंना
अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक
प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा एकाही खेळाडूची निवड
झालेली नाही. निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या
अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
अर्जुन पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या खेळाडूंमध्ये तेजस्विन शंकर, मुहम्मद
अजमल व्ही., प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, बुद्धिबळपटू विदित गुजराथी
आणि दिव्या देशमुख यांचा समावेश आहे.
याशिवाय हॉकीपटू लालरेमसियामी आणि राजकुमार पाल, नेमबाज
अखिल श्योराण, पॅरा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अॅथलीट एकता भ्यान, रोइंगपटू अरविंद सिंह,
बॉक्सर नरेंद्र, कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा
तसेच नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
माजी भारतीय फुटबॉलपटू आय. अरुमैनायगम यांना अर्जुन पुरस्काराच्या
जीवनगौरव श्रेणीत सन्मानित करण्यात येणार आहे. 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या
भारतीय संघात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत
त्यांनी तीन वेळा ड्युरंड कप जिंकला आहे. यंदाच्या पुरस्कारांची सर्वाधिक चर्चा
मात्र खेलरत्न पुरस्कारामुळे होत आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न हा भारतातील क्रीडा
क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. गेल्या वर्षी डी. गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार आणि मनू भाकर या चार
खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.
यंदा द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही प्रशिक्षकांची निवड करण्यात आली
आहे. अॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव आणि नेमबाजी
प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. जीवनगौरव श्रेणीत
बॉक्सिंग प्रशिक्षक धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार
यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा क्षेत्राच्या
विकासासाठी दिला जाणारा राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातील Army
Paralympic Node यांना जाहीर करण्यात आला आहे.